हे विनायक स्थान पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी आहे. हे क्षेत्र श्री शंकरांनी बसविले असे म्हणतात. पूर्वी याला मणिपूर असे म्हणतात. श्री शंकरांनी गृत्समदपुत्राचा त्रिपुरासुराचा येथेच वध केला.
श्री क्षेत्र रांजणगाव हे शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे आहे. त्यासाठी
- पुणे येथे येऊन रांजणगावला जाणे सोयीस्कर आहे.
- पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर रांजणगाव आहे. तेथे जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून पुष्कळ गाड्या आहेत.
- रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास पुणे दौंड मार्गांवर उरुळी स्टेशनवर उतरावे. तेथून १६ कि. मी. घोड नदीच्या काठावरील रस्त्यावर रांजणगाव आहे.
रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात दिशासाधन केले आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यानकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि सिद्धि उभ्या आहेत.