व्हिक्टोरिया टर्मिनस् – कहाणी मुंबईची – Victoria Terminus Mumbai
कहाणी मुंबईची ह्या सदरात जाणून घ्या व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ची माहिती.
बोरीबंदर हे जहाजांचे बंदर होते. तिथेच मूळचे मुंबादेवीचे मंदिर होते. ते कुतुबुद्दीनने पाडून टाकले होते. १३१७ मध्ये ते पुन्हा उभारले परंतु पोर्तुगीजांनी पुन्हा पाडून टाकले. देवळाजवळ तलाव होता त्या ठिकाणी पोर्तुगीज अमलात फाशी देण्याची व्यवस्था केली होती. म्हणून तलावाला फाशीचा तलाव असे म्हणण्यात येई.
बोरीबंदरचे पहिले स्थानक लाकडी इमारतीत होते. सध्याची इमारत एफ्. डब्ल्यू. स्टीव्हन्स याने बांधली आहे. त्याचे स्थानिक सहाय्यक रावसाहेब सीताराम खंडेराव आणि एम. जनार्दन हे होते. या तीन मजली इमारतीला २७ लाख रुपये खर्च आला. इमारतीवरील नक्षी आणि खोदकामावर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डीन ग्रिफिथ्स् यांनी देखरेख केली. बांधकाम १८७८ साली सुरू झाले ते १८८८ मध्ये पूर्ण झाले. १८८७ साली व्हिक्टोरिया राणीची ज्यूबिली झाली त्या निमित्ताने बोरीबंदर स्टेशनला व्हिक्टोरिया टर्मिनस् असे नाव देण्यात आले.
इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. त्या बाजूच्या कुंपणावर वाघ आणि सिंह यांची भव्य शिल्पे आहेत. मधल्या चौकातील दर्शनी भागावर वर्तुळाकृती दगडी कोंदण आहे. त्यात सर जमशेदजी जिजिभाई, लॉर्ड एलफिन्स्टन, लॉर्ड रे, माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन, सर बार्टल फ्रियर, नाना शंकरशेट यांचे मुखवटे कोरले आहेत. बाजूच्या कोपऱ्यात भारतातील निरनिराळ्या जमातीच्या प्रातिनिधिक पुरुषाचे मुखवटे कोरले आहेत. वरच्या घुमटाखाली साडेआठ फूट व्यासाचे घडयाळ बसवले आहे. घडयाळाखाली साडेसात फूट उंच व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे. घुमटाच्या शिरोभागी प्रगतीचा निर्देशक असा साडेसोळा फूट उंचीचा पुतळा आहे.
संदर्भ: मुंबईचा वृत्तांत